जेष्ठागौरीची मराठी कथा व आरती

पूजा विधी

जेष्ठागौरीची मराठी कथा

आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण रहात होता. एके दिवशी काय झाले ? भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनीं गौरी (महालक्ष्मी) आणल्या जात होत्या , रस्त्याच्या कडेकडेने बायका नजरेस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिले. मुले घरी आली आणि आईला सांगितले, आई, आई गं , आपल्या घरी गौरी का बरं आणत नाही ! आई म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करूं ? तिची पूजा/अर्चा केली गेली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर काहीचं नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणीन ! मुले तिथून उठली, बाबांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा आणि घावनघाटल्याचे साहित्य घेऊन या , म्हणजे आई गौरी आणील !

बाबांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला.सोन्यासारखी मुले आहेत माझी , पण त्यांचा हा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढं उपाय नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने ह्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचं समाधान केले. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले.

बायको घरात गेली आणि आंबिलीकरिता कण्या पाहू लागली. तो मडके आपले कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवले वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली. सगळे जण आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली. देवाला घावनघाटलयाचा नैवेद्य कर, घरात काही नाही असे म्हणू नको, रडगाणं गाऊ नकोस . ब्राह्मण त्याच वेळेस उठला आणि घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलेस का ? आजीबाईला न्हाऊ घाल, असे सांगितले. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळे सामान आणले. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलबाळसुद्धा पोटभर जेवली.

म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाले ,आजी तू दूध कोठूनआणार ? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको.आत्ता ऊठ आणि तुला जितक्या गाई किंवा म्हशी पाहिजे असतील तितके खुटे बांध . त्या सगळ्यांना दावी बांध. संध्याकाळी शुभ मुहूर्तावर गाई-म्हशीची नाव घेऊन जोरात हाक मार म्हणजे त्या तुझ्या गोठ्यात येतील. तुझा गोठा पूर्ण भरेल. त्याच दूध काढ ! ब्राह्मणाने तसे केले, गाई-म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांसहित धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई-म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले.

दुसऱ्याच दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली कि मुला मला आत्ताच्या आत्ता पोचती कर ! ब्राह्मण म्हणू लागला की आजी, तुमच्या कृपेने मला आता सगळे सुख प्राप्त झाले आहे .आता मी तुम्हाला कश्या पोचत्या करू ? तुम्ही गेल्या तर हे सगळे सुख नाहीसे होईल ! म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच ! मला आज पोचती कर ! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले सगळे सुख असेच वाढत राहावे असा काहीतरी उपाय सांगा !

गौरायानी सांगितले की, तुला मी येतांना थोडी वाळू देईन,ती सगळ्या घरभर टाक. हाडांवर टाक, मडक्यावर टाक, गोठ्यात टाक असे केलेस तर तुझे सगळे सुख प्राप्त झालेले कधीच नाहीशे होणार नाही . ब्राह्मणाने बरे म्हटले. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भादव्याच्या महिन्यांत तळ्याच्या पाळी जावे. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड चा नैवेद्य करा ,तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून त्याची बोळवण करावी म्हणजे त्याला भरभराटीच सुख मिळेल. संतत मिळेल. ही ६० उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईंच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण अश्या प्रकारे कुठे ची सांगता झाली .

जेष्ठागौरीची मराठी आरती

भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा, अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा ।

गणेशा सहित गौरी धनिष्ठा बैसली येउनि सकळिया निष्ठा ।।१।।
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी ।

कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेवी जयदेवी ।। धृ।।

ज्येष्ठा नक्षत्र पूजेचा महिमा, षडरस पक्वान्ने होती सुखधामा ।

सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी०।।

उत्थापन मूळावर होता अगजाई, वर देती झाली देवी विप्राचे गृही ।

रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी, वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।

।। जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी०।।

सोन्याच्या पावलाने आरती मराठी

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडा हाती शोभे हिरवा चुडा । दिला प्रसादाचा पेढा || धृ.१।।

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

नेत्रांच्या लावल्या वाती । पंच प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती । तेथे नाविण्याच्या ज्योती ।।धृ .२ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

भावभक्तीच्या केल्या माळा | घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे पुंगरमाळा | केला … सोहळा || धृ .३ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

रेणुकेची भरली ओटी । लावली चंदन ऊटी किर्ती तिची जगजेठी । झाली दर्शना दाटी ।।धृ .४ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्यामुळे होणारी फलप्राप्ती याचे महत्व जाणून घेण्या साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *