कापूस शिल्पकार अनंत खैरनार
गणेशाच्या विविध रूपांचं आकर्षण प्रत्येकाला असतं. ते रूप साकारताना त्या कलाकाराची मेहनत आणि किमया त्यात अवतरलेली असते. कापूस शिल्पकार अनंत खैरनार (Anant Khairnar) यांनीही असंच एक अनोखं शिल्प साकारलं आहे. खैरनार यांनी कापसापासून दीड फूट उंचीच्या गणेशाची मूर्ती (Cotton Ganesha Idol) तयार केली आहे. मूर्तीचं वजन अवघं २५० ग्रॅम आहे. ही मनोहारी मूर्ती कुतूहलाचा विषय ठरली आहे.
कशी केली जाते मूर्ती? (How to Make Ganesha idol From Cotton?)
शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, लाकूड किंवा धातूपासून गणेश मूर्ती तयार केल्याचं आपण पाहतो; परंतु कापसाचा वापर करून मूर्ती तयार करण्याची अनोखी कला कापूस शिल्पकार अनंत खैरनार यांनी गेल्या ३५ वर्षांपासून जपली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचं औचित्य साधून नागरिकांच्या मागणीवरून पर्यावरणपूरक कापसापासून त्यांनी काही गणेश मूर्ती साकारल्या आहेत. एक व दीड फूट उंच, वजनानं हलक्या आणि खाण्याच्या रंगांनी रंगविलेल्या आकर्षक मूर्ती त्यांनी यंदा साकारल्या आहेत. या मूर्तींना महाराष्ट्र, हैदराबाद, भोपाळमधून मागणी होती. या मूर्तींची काही घरांत प्रतिष्ठापना झाली आहे. एक मूर्ती साकारायला साधारण दोन दिवस लागतात. मात्र, मूर्ती पर्यावरणपूरक असल्यानं कापसापासून तयार केलेल्या या मूर्तींना नाशिककरांची मागणी वाढत असल्याचं खैरनार सांगतात.
‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’कडूनही दखल
गंगापूर रोड इथं राहणारे अनंत नारायण खैरनार हे जागतिक कीर्तीचे कापूस शिल्पकार आहेत. बालपणापासूनच ते हरहुन्नरी आणि कलासक्त आहेत. ते खरं तर रसायनशास्त्राचे पदवीधर. ‘एचआयसी’तल्या नोकरीमधून स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांनी पूर्ण वेळ कापूस शिल्पकलेला वाहून घेतलं. शिल्पकलेचं कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नसताना खैरनार यांनी १९८७ मध्ये कापसापासून पहिली गणेश मूर्ती तयार केली आणि तिथूनच कापूस शिल्पकलेची सुरुवात झाली. त्यांनी महात्मा गांधीजींचं साडेसात फूट उंच कापूस शिल्प तयार केलं आहे. त्याची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनं घेतली. लक्झेम्बर्ग आर्ट प्राइज, आउटस्टँडिंग यंग इंडियन, इंटरनॅशनल स्कल्प्चर सेंटर, अमेरिका आदी पुरस्कार त्यांना मिळाले. भारतातल्या विविध शहरांत त्यांनी आपली कला प्रदर्शितही केली आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक कापूस शिल्प तयार करून त्यांनी ती ३० देशांत पोहोचवली आहेत. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित अनंत खैरनार यांचा देशात आणि विदेशात मोठा चाहता वर्ग आहे.